लोकशाही न्यूज नेटवर्क
आसाममध्ये आगामी मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार नाही, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. सीएएवरून राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
आसामच्या नागरिकांसाठी सीएए-एनआरसी हा कळीचा मुद्दा आहे. आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर सीएए लिहिले असून त्यावर क्रॉस केलं आहे. हा कायदा काहीही झालं तरी आम्ही लागू होऊ देणार नाही. हम दो, हमारे दो वाल्यांनी हे नीट ऐकून घ्यावं, असं राहुल गांधी यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.
आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनाही किमान भत्ता वाढवून देण्याचं आश्वासन यावेळी राहुल यांनी दिलं. आसामला आसामचाच मुख्यमंत्री हवा असल्याचंही यावेळी ते म्हणाले. तसंच आसाम कराराचेही पालन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.