दिल्ली स्थित 'शक्ती भोग फूड्स लिमिटेड' कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप केवल कुमार यांच्यावर आहे. केवल यांना अटक केल्यानंतर ईडीच्या विशेष कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं आणि ९ जुलैपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
केवल कुमार यांना अटक करण्याआधी ईडीनं कुमार यांच्याशी संबंधित दिल्ली आणि हरियाणातील एकूण ९ ठिकाणांवर छापेमारी केली होती. यात महत्वाची कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. "छापेमारीत काही महत्वाची कागदपत्रं आणि आर्थिक घोटाळ्याशी संबंधित काही डिजिटल स्वरुपातील पुरावे हाती लागले आहेत", असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.