महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. त्यानंतर आता बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे. मात्र, बारामती मतदारसंघामध्ये वातावरण ढवळल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
थोडक्यात
बारामती मतदारसंघात वातावरण ढवळलं
अजित पवार गटाकडून कार्यकर्त्याला धमकी
युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्याला दमदाटी
युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांचा मोठा आरोप
बारामती मतदारसंघात वातावरण ढवळल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्याला धमकी, दमदाटी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मोठा आरोप केला आहे.
दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
शर्मिला पवार यांच्याकडून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर अजित पवार गटाकडून शर्मिला पवार यांची एन्ट्रीच बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. बारामती शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. मात्र, शर्मिला पवार यांचा आरोप तथ्यहीन असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मुळात शर्मिला पवार मतदान केंद्रात आत गेल्याच कशा असा सवाल अजित पवार गटांचे किरण गुजर यांनी उपस्थित केला आहे. मात्र, शर्मिला पवार यांच्याकडून लवकरच याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शर्मिला पवार यांच बालक मंदिर या जाणं हे बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे किरण गुजर यांनी केला.
बारामतीमध्ये कोण मारणार बाजी?
बारामतीमध्ये काका आणि पुतण्यांमध्ये चुरस होत आहे. शरद पवार यांचे नातू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत उभे आहेत. बारामती विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत बारामतीचा बालेकिल्ल्यात अजित पवार यांना पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद वि. भावजय सामना पाहायला मिळाला होता. लोकसभेत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढल्या. सुनेत्रा पवार यांना तब्बल दीड लाख मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काका वि. पुतण्यामध्ये कोण बाजी पाहणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.