काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेलं एक पत्र ट्वीट केलंय. हे पत्र ट्वीट करताना शशी थरूर यांनी 'आपले राजकीय नेते वाचायचे, लिहायचे, विचार करायचे आणि एकमेकांची काळजीही करायचे. तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलोय?' असं मत व्यक्त केलंय.
शशी थरूर यांनी ट्वीट केलेल्या सुभाषचंद्र बोस यांचं हे पत्र ३० जून १९३६ रोजी दार्जिलिंगच्या पोलीस अधीक्षकांच्या घरून लिहिलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांनी या पत्रात लिहिलं आहे, "प्रिय जवाहर, तुमचं पत्र मिळालं. तुम्ही खूप जास्त प्रमाणात काम करत आहात असं मला समजलं. मला तुमच्या प्रकृतीविषयी काळजी वाटते आहे. मात्र, मला याचा आनंद आहे की तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना पण काम थांबवून मसुरी येथे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला."