म्युनिच येथे सुरू असलेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाला. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम प्रकारात भारताच्या आर्या बोरसे आणि अर्जुन बाबूता या जोडीने जोरदार खेळी करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या झिफेई वांग आणि लिहाओ शेंग या अनुभवी आणि ऑलिम्पिक विजेत्या जोडीला 17-7 ने पराभूत केले.
या सामन्याच्या सुरुवातीला चीनने आघाडी घेतली होती, पण भारतीय नेमबाजांनी संयम राखत सामन्याचा प्रवाह आपल्या बाजूने वळवला. त्यांनी सलग चार फेऱ्यांमध्ये विजय मिळवून 8-2 अशी आघाडी घेत निर्णायक वर्चस्व गाजवले.पात्रता फेरीत बोरसे आणि बाबूताने 635.2 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले होते, तर वांग आणि शेंग यांनी 635.9 गुणांसह जागतिक विक्रम नोंदवला होता. मात्र अंतिम फेरीत भारतीयांनी अधिक प्रभावी नेमबाजी करत विजय साकारला.
याआधी आर्या बोरसेने लिमा, पेरू येथील स्पर्धेत रुद्रांक्ष पाटीलसोबत मिक्स्ड टीम प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. यंदाच्या नेमबाजी स्पर्धेत भारताची दुसरी जोडी, एलावेनील वलारिवन आणि अंकुश जाधव हे सहाव्या क्रमांकावर राहिली.नॉर्वेच्या जेनेट डुएस्टाड आणि जॉन-हर्मन हेग यांनी अमेरिकेच्या सागेन मॅडलेना आणि पीटर फिओरी यांचा 16-14 ने पराभव करत कांस्यपदक मिळवले.
या सुवर्ण विजयासह भारताने स्पर्धेत एकूण चार पदकांची कमाई केली आहे. सुरुचि सिंगने याआधी सुवर्णपदक मिळवले असून सिफत कौर समरा आणि एलावेनील वलारिवन यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळवले आहे. दरम्यान, 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम प्रकारात मनु भाकर आणि आदित्य मलरा या जोडीने पात्रता फेरीत 577 गुणांसह सहावे स्थान मिळवले. या वर्ल्ड कपमध्ये नेमबाजी प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी आर्या बोरसे ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्रासाठी ही विशेष अभिमानाची बाब आहे.