(Asia Cup 2025) क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत अखेर आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र श्रेयस अय्यरला यावेळी संघात स्थान मिळालेले नाही.
आशिया चषक २०२५ स्पर्धा येत्या ९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आहे. अखेरीस सर्व अडथळे दूर करून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला हिरवा कंदील मिळाला. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत, ज्यांची विभागणी ४-४ संघांच्या दोन गटांत करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात असून, पुन्हा एकदा ‘हायव्होल्टेज सामना’ क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
भारताचा 15 सदस्यीय संघ तरुणाई व अनुभवी खेळाडूंचा योग्य मेळ साधून निवडला आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीला सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिलक वर्मा, रिंकू सिंह यांसारखे युवा खेळाडू संघात कायम असून, फिनिशरच्या भूमिकेत रिंकू सिंहकडून अपेक्षा असतील.
हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांना निवडण्यात आले आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे वेगवान खेळाडू असून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवची जोडी सज्ज आहे.
भारताचा आशिया चषक 2025 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह