भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या केंद्रीय करार प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने चार स्तरीय वार्षिक रिटेनरशिप प्रणालीमधून A+ श्रेणी पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. या निर्णयामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज खेळाडूंना मोठा धक्का बसू शकतो. २०२५-२०२६ साठीची नवीन करार यादी जाहीर होण्यापूर्वीच या शिफारसींमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
निवड समितीने बीसीसीआयला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, A+ श्रेणी बंद झाल्यास सध्या या श्रेणीत असलेले खेळाडू थेट A किंवा B श्रेणीत ढकलले जाण्याची शक्यता आहे. सध्या A+ मध्ये असलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना दरवर्षी सात कोटी रुपयांचे मानधन मिळते. मात्र, ही श्रेणी बंद झाल्यास त्यांना पाच कोटी किंवा तीन कोटींच्या श्रेणीत सामावावे लागेल. बीसीसीआयने अद्याप कोणत्याही वरिष्ठ खेळाडूसोबत करार केलेला नाही. हा प्रस्ताव मंडळाच्या पुढील परिषद बैठकीत चर्चेला घातला जाईल आणि तेथेच अंतिम निर्णय होईल.
बीसीसीआयची करार प्रणाली चार श्रेण्यांवर आधारित आहे. A+ श्रेणीतील खेळाडूला सात कोटी, A श्रेणीला पाच कोटी, B श्रेणीला तीन कोटी आणि C श्रेणीला एक कोटी रुपयांचे वार्षिक मानधन मिळते. सध्या A श्रेणीत ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. B श्रेणीत श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, यशस्वी जायसवाल आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू आहेत. C श्रेणी ही सर्वात मोठी असून, रुतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, शिवम दुबे, रजत पाटील, रिंकू सिंग, टिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा आणि आकाश दीप यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
या बदलामुळे भारतीय क्रिकेटमधील वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकेवर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. निवड समितीचा हा सल्ला खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि संघातील भूमिकेवर आधारित आहे. क्रिकेटप्रेमी आता मंडळाच्या बैठकीचा निर्णय आणि नवीन करार यादीची वाट पाहत आहेत. हा निर्णय लागू झाल्यास युवा खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.