२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील गट टप्प्यातील सामने जवळजवळ संपले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडाचा भारतीय वंशाचा माजी कर्णधार नवनीत धालीवाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कॅनडा विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी, संघाचा शेवटचा गट सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल आणि हाच नवनीतचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल. १९ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यानंतर ३७ वर्षीय नवनीत धालीवाल आपली ११ वर्षांची यशस्वी कारकीर्द संपवतील.
२०१५ मध्ये कॅनडासाठी पदार्पण केलेल्या धालीवालने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. ४८ टी-२० सामन्यांत त्याने सरासरी ३२ पेक्षा जास्त ठेवत १,३०५ धावा केल्या. याशिवाय, त्याने २९ टी-२० आणि चार एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅनडाचे नेतृत्व केले, ज्यातील २१ विजय मिळवले.
२०२६ विश्वचषकात कॅनडाला आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, पण २०२४ विश्वचषकासाठी पात्रता मिळवणे हा धालीवालसाठी खास क्षण ठरला. निवृत्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “मी आधीच हा निर्णय घेतला होता. ११ वर्षांहून अधिक काळ खेळलो आहे. हे नियोजित होते, पण अफगाणिस्तानविरुद्धचा सामना माझा शेवटचा असेल. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात धावा काढणे आणि कर्णधार म्हणून खेळणे हा अभिमानाचा क्षण होता. मी कोचिंगमध्ये करिअर करण्याचा विचार करतोय, पण राष्ट्रीय स्तरावर नाही. माझी प्राथमिकता तरुण खेळाडूंना घडवणे असेल.” धालीवालच्या निवृत्तीमुळे कॅनडाच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असला तरी, त्यांच्या नेतृत्वाने दिलेल्या योगदानाची आठवण कायम राहील.