"बुद्धिबळ खेळ"’ म्हणजे दोन बुद्धिवंतांमधील लढा आहे. बुद्धिबळाचा डाव म्हणजे माणसाच्या मेंदूला उत्तम व्यायाम घडवून त्याचा तल्लखपणा वाढविणारा प्रकार होय. स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. इ.स. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन गुकेशने, वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनला हरवलं.क्लासिकल चेस प्रकारात यापुढे खेळावं की नाही याचाच विचार आता करायला हवा, अशी प्रतिक्रिया कार्लसनने या मॅचनंतर दिली. विश्वनाथन आनंदपासून ते आता गुकेश, प्रज्ञाननंद, कोनेरू हंपी, वैशाली, विधित गुजराती या सगळ्यांची नावं आपण सातत्याने ऐकतोय आणि त्यासोबत क्लासिकल चेस, रॅपिड चेस हे शब्दही. बुद्धिबळाचे हे प्रकार काय आहेत याबाबत आपण जाणुन घेऊया...
या बुद्धिबळाच्या पटावर काळे-पांढरे असे 8X8 असे 64 चौकोन म्हणजे घरं असतात. डाव खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंकडे असतात 16 सोंगट्या किंवा मोहरे. काळ्या आणि पांढऱ्या रंगांचे 16-16 मोहरे.पांढरे मोहरे असणारा खेळाडू पहिली चाल करतो. आणि ज्या खेळाडूचा राजा धोक्यात येतो, तो वाचवणं शक्य नसतं तेव्हा चेकमेट होऊन तो खेळाडू हरतो.इंटरनॅशनल चेस फेडरेशन - FIDE (फिडे) ही संस्था बुद्धिबळासाठीची नियामक संस्था आहे.हीच संस्था वर्ल्ड चेस रँकिंग्स जाहीर करते.
१) क्लासिकल चेस
क्लासिकल चेसला स्टँडर्ड चेस किंवा स्लो चेस असंही म्हणतात.बुद्धिबळातला हा लाँग फॉर्म आहे. क्रिकेटमधल्या टेस्ट मॅचसारखा. अधिक काळ चालणारा.यामध्ये प्रत्येक खेळाडूकडे चाल करण्यासाठी पुरेसा वेळ हातात असतो. इथे प्रत्येक चालीआधी विचार करण्यासाठी वेळ असतो, म्हणूनच चुका होण्याची शक्यता फार कमी असते.पुढच्या प्रत्येक चालींसाठी खेळाडूंना ठराविक एक्स्ट्रा वेळ मिळतो. त्यामुळेच क्लासिकल चेसचे गेम्स कित्येक तास चालू शकतात.अनेकदा हे गेम्स ड्रॉ होतात. उदा . -1989 मध्ये इव्हान निकोलिक आणि गोरान आर्सोविक यांच्यात बेलग्रेडमध्ये झालेली मॅच हा आजवरचा सर्वात प्रदीर्घ क्लासिकल चेस सामना आहे. तब्बल 20 तास 15 मिनिटं आणि 269 चालींचा हा सामना ड्रॉ झाला होता.
रॅपिड चेस
क्लासिकल बुद्धिबळापेक्षा हा थोडा वेगवान प्रकार आहे . म्हणजे क्रिकेटच्या वन-डे मॅचसारखा. टेस्ट मॅचपेक्षा वेगवान, पण टी-20 पेक्षा स्लो.याचे नियम क्लासिकल चेससारखेच असतात. पण प्रत्येक खेळाडूकडे संपूर्ण डाव खेळण्यासाठी 10 ते 60 मिनिटांचाच कालावधी असतो.घड्याळाचा ताण या प्रकारात थोडा वाढतो, त्यामुळे चुका होण्याची शक्यताही वाढते. वेळ जसा संपत येतो - तसं स्लॉग ओव्हर्ससारखं प्रेशर येतं. या टप्प्यात खेळाडू रिस्क घेऊन चाली करतात.
ब्लिट्स चेस
हा सर्वात वेगवान आहे. क्रिकेटच्या T20 सारखा. किंवा टेनिसच्या टाय ब्रेकरसारखा. इथे प्रत्येक खेळाडूला संपूर्ण डाव संपवण्यासाठी जास्तीत जास्त 10 मिनिटं मिळू शकतात. या प्रकारात खेळाडूंना फास्ट विचार करावा लागतो आणि तत्पर हालचाली कराव्या लागतात. 2006 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप खेळवण्यात आली होती.
बुलेट चेस
ऑनलाईन बुद्धिबळ खेळणाऱ्यांमध्ये हा प्रकार लोकप्रिय आहे. हा ब्लिट्झचाच एक प्रकार आहे. यामध्ये खेळाडूंकडे अतिशय कमी वेळ असतो. जेमतेम 3 मिनिटं वेळ विचार करण्यासाठी दिला जातो.
Chess960 (फिशर रँडम):
हा थोडा वेगळा बुद्धिबळाचा प्रकार आहे .या प्रकारात, खेळाडू पहिल्या रांगेत हत्ती, घोडे, उंट, राणी, राजा यांसारख्या मोहरांची मांडणी बदलू शकतात, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूचा खेळ अधिक वेगळा होतो. +-याव्यतिरिक्त, बुद्धिबळाचे काही अन्य प्रकार देखील आहेत, जसे की "गिवअवे चेस", "अँटिचेस" आणि "पर्य बुद्धिबळ असे ही बुध्दिबळाचे आणखी काही प्रकार आहेत.