गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan vs Pakistan War) यांच्यात सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमकी सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) काबूलमध्ये काही ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर युद्ध अजून पेटले. 8 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. मात्र, शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने पक्तिका प्रांतात बॉम्बहल्ले केले, ज्यात नागरी वस्तीवर निशाणा साधण्यात आला. अनेक तरुण क्रिकेटपटूंना या हल्ल्यात जीव गमवावा लागला.
तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू
पक्तिका प्रांतातील या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट समुदायावर शोककळा पसरली आहे. स्थानिक क्लबचे तीन क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथे स्थानिक स्पर्धा खेळून अरगुन घरी जात होते. या घटनेबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB)तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत खेळाडूंना “अफगाण क्रिकेटचे भूमिगत हिरो” असे संबोधले.
मालिका रद्द
पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) हवाई हल्ल्यात अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. पुढील महिन्यात, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबतच्या तीन देशांच्या टी20 क्रिकेट मालिकेतूनही बोर्डाने औपचारिकपणे माघार घेण्याची घोषणा केली. अफगाण नागरिकांच्या शहीद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळणे नैतिकदृष्ट्या अशक्य असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.