आशिया कप 2025 मध्ये भारतीय तरुण फलंदाज अभिषेक शर्माच्या तडाखेबाज खेळीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दमछाक केली आहे. विशेषत: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांतील त्याचा आक्रमक अंदाज चर्चेत आला होता. या कामगिरीनंतर आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माने नवा इतिहास रचला असून तो अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारताचा दबदबा फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू या सर्वच विभागांत कायम असताना अभिषेकने मिळवलेले हे यश भारतीय शिरपेचातील मानाचा तुरा मानले जात आहे.
अभिषेक शर्मा 907 रेटिंग पॉइंटसह या क्रमवारीत पोहोचला आहे. त्यामुळे 900 पेक्षा जास्त रेटिंग मिळवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो सूर्यकुमार यादव (912) आणि विराट कोहली (909) यांच्या बरोबरीने उभा राहिला आहे. विशेष म्हणजे इतक्या उंचावलेल्या रेटिंगपर्यंत मजल मारणारा तो पहिला भारतीय डावखुरा ठरला आहे.
या कामगिरीमुळे जागतिक विक्रम मोडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंडच्या डेविड मलानने 2020 मध्ये 919 रेटिंग पॉइंट्स मिळवत विक्रमी मजल मारली होती. अभिषेक सध्या केवळ 13 पॉइंट्स दूर असून, पुढील सामन्यांतच हा पराक्रम साध्य करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
आशिया कपमधील चार सामन्यांत अभिषेकने 173 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 208 पेक्षा अधिक असून त्याने आतापर्यंत 12 षटकार आणि 17 चौकार लगावले आहेत. त्याचा हा फॉर्म पाहता आगामी सुपर-4 फेरीतील बांग्लादेश व श्रीलंका विरुद्धच्या लढतींत त्याचा विक्रमी खेळ कायम राहणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अभिषेक शर्माची ही ऐतिहासिक कामगिरी केवळ भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नवा मापदंड ठरत असून, टीम इंडियासाठी अभिमानास्पद ठरत आहे.