काल पंजाबच्या मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स आमने सामने आले. यादरम्यान क्वालिफायर 1 च्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत पंजाबने बंगळुरू समोर अवघ्या 101 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान स्विकारत बंगळुरूने केवळ 2 गडी गमावून 106 धावांसह अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
यावेळी त्यांनी पंजाब किंग्सला 8 विकेट्सने पराभूत केले. बंगळुरूची फायनलमध्ये जाण्याची ही 4 थी वेळ आहे. त्यांनी याआधी 2009, 2011 आणि 2016 या साली अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र आरसीबीने अजून एकही ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे आरसीबीचा आणि विराट़ कोहलीचा प्रत्येक चाहता हा 3 जूनची आतुरतेने वाट पाहत आहे. यावेळी आरसीबीच ट्रॉफी जिंकणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र हे अंतिम सामन्यादरम्यान पाहायला मिळणार आहे.
बंगळुरूच्या दणदणीत विजयावर बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदार याने संघाचे कौतुक केले, तसेच चाहत्यांनाही खास मेसेज दिला. यावेळी रजत पाटिदार म्हणाला की, " मला वाटतं वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला वापर केला. याचं उदाहरण म्हणजे, सुयश शर्माने ज्याप्रकारे विकेट्स घेतल्या, त्याने त्याचा टप्पा योग्य राखला होता. त्याची गुगली समजणं फलंदाजांसाठी कठीण आहे. कर्णधार म्हणून मला त्याच्या गोलंदाजीबाबत पूर्ण स्पष्टता आहे. जी खूप चांगली गोष्ट आहे. तसेच फिल सॉल्टने ही संघासाठी ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, मी त्याचा मोठा चाहता झालो".
पुढे चाहत्यांसाठी रजत म्हणाला की, "फक्त चिन्नास्वामीच नाही, तर जिथेही आम्ही जातो, तिथे आम्हाला घरचं मैदान असल्यासारखं त्यांच्यामुळे जाणवतं. त्यामुळे मी नेहमीच बंगळुरूच्या चाहत्यांप्रती कृतज्ञ आहे. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अजून एक सामना आणि मग एकत्र सेलीब्रेशन करू. त्यामुळे आम्हाला पाठिंबा देत राहा. आम्ही या स्पर्धेत खूप सराव केला आहे, त्यामुळे एखाद्या दिवशी सराव न करण्याचा फार फरक पडत नाही".