आयपीएलला पुन्हा सुरुवात होत आहे. यामुळे देशभरातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. यामगचं कारण असं की, मिशेल स्टार्कनंतर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि डोनोव्हन फरेरा यांनीही उर्वरित आयपीएलमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
फाफ डू प्लेसिसने 6 सामन्यांत 168 धावा केल्या, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे, मात्र दुखापतीमुळे तो काही सामने खेळू शकला नाही. तर दुसरीकडे डोनोव्हन फरेराला एका सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. तर आता या दोघांनी माघार घेतल्यामुळे दिल्लीपुढे फलंदाजांचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. असं असताना आता उपाय म्हणून अभिषेक पोरेलसह करुण नायर किंवा केएल राहुल सलामी फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे.
त्याचसोबत जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या जागी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा दिल्लीने संघात समावेश केला आहे. मात्र याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्ससाठी उर्वरित तीन सामने खेळण हे फार संघर्षाचे असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 11 सामन्यांत 6 विजयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. जर त्यांनी उरलेले तीन सामने जिंकले तर त्यांना दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवण्याची संधी आहे.
आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरवात
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीएलचे नवीन वेळापत्रक समोर आले असून आज 17 मे पासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार असून दोन दिवशी दोन सामने असणार आहेत. यासोबतच उर्वरित सामने जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. लीग टप्प्यातील उर्वरित 13 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.