पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान संपुर्ण जगभरात हळहळ व्यक्त केला जात आहे. एवढचं नव्हे तर कलाकारांकडून तसेच अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या घटनांचा निषेध केला आहे. याचपार्श्वभूमीवर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी देखील या "घृणास्पद" आणि "कायर कृत्याचा" निषेध केला आणि शोकग्रस्तांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला. तसेच जे पर्यटक तिथे मृत्युमुखी पावले आणि जे पर्यटक जखमी झाले अशा पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ जागतिक आणि कॉन्टिनेन्टल स्पर्धांमध्ये एकमेकांशी खेळतात. मात्र दोन्ही शेजारी देशांमधील वाढत्या तणावामुळे 2012-13 पासून भारत पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेला नाही. 2025 च्या दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने-सामने पाहायला मिळाले. मात्र आता पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यावरुन बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा पाकिस्तानवर आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यांनी "भारत पाकिस्तानसोबत कोणत्याही द्विपक्षीय क्रिकेट मालिकेत सहभागी होणार नाही आणि ते आयसीसीमुळेच जागतिक स्पर्धेत खेळतात", असे आश्वासन दिले आहे.
तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, "पहलगाम येथे काल झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जीव गमावल्यामुळे क्रिकेट जगताला खूप धक्का बसला आहे. जे काही घडत आहे त्याची आयसीसीलाही जाणीव आहे, आम्ही पीडितांसोबत आहोत आणि आम्ही त्याचा निषेध करतो. बीसीसीआयच्या वतीने दहशदवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करताना मी पीडित कुटुंबांना मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन, आम्ही या दुःखद क्षणी हातात हात घालून उभे आहोत. आम्ही सरकारच्या सांगण्यावरुन पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिकेत खेळत नाही. पुढे आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही. पण जेव्हा आयसीसी स्पर्धेचा विचार केला जातो तेव्हा आम्ही आयसीसीच्या सहभागामुळे खेळतो".