भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारत इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान आज पुन्हा एका खेळाडूने एक्झिट घेतली आहे. खेळाडूला जबरदस्त दुखापतीमुळे चौथ्या सामान्यामधून अचानक एक्झिट घ्यावी लागल्यामुळे मालिका जिंकण्याच्या दृष्टीने भारताला मिळालेला हा तिसरा मोठा झटका आहे.
ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी तसेच फास्टर गोलंदाज अर्शदीप सिंह यानंतर आता आकाश दीप सुद्धा इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाच्या लढतीमधून बाहेर पडला आहे. याची अधिकृत माहिती भारतीय क्रिकेटसंघाचा कप्तान शुभमन गिल याने पत्रकारांशी बोलताना दिली. भारताचा वेगवान समजला जाणारा उत्कृष्ट गोलंदाज आकाश दीप याला झालेल्या दुखापतीमुळे अचानक टीममधून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
एकापाठोपाठ एक उत्कृष्ट टीम मेंबर बाहेर गेल्यामुळे आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे निश्चित आहे. आकाशला तिसऱ्या सामन्यामध्ये केलेल्या गोलंदाजीदरम्यान दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला मधूनच मैदान सोडून जावे लागले होते. यामुळे आकाश चौथा सामना खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण केली जात होती. मात्र या शंकेला पूर्णविराम देत शुभमन गिलने आकाश चौथ्या सामन्यात खेळत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला टीम इंडियाला अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
टीम इंडियाची पडती बाजू लक्षात घेता 23 जुलैला होणाऱ्या सामन्यात इंग्लडला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र अश्या वेळी आता शुभमन गिल टीमच्या बाबतीत कोणते महत्वाचे निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान आकाश अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा एकूण आणि भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.