3-06-2025 हा दिवस आणि ही तारीख आरसीबी तसेच सर्व क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. अखेर 18 वर्षांची प्रतिक्षा आरसीबीच्या आणि विराटच्या कामी आली. तब्बल 17 वर्ष विजयासाठी लढत 3 वेळा फायनलमध्ये आलेल्या आरसीबीला आणि विराटला 18 व्या वर्षी यश मिळालं. अखेर त्याच्या देखील हातात आयपीएलची ट्रॉफी झळकताना पाहायला मिळाली. या विजयाने जितका भावून विराट झाला तितकेच त्याचे फॅन त्याला पाहून भावूक झाले. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्स केल्या. बंगळुरुनं पंजाबला 191 धावांच्या आव्हान दिलं होते. मात्र पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली.
यावेळी ज्याप्रमाणे आरसीबीच्या फलंदाजांनी सामन्या जिंकण्यासाठी आपले अथक प्रयत्न लावले त्याचप्रमाणे आरसीबीचे गोलंदाज ही या सामन्यात पंजाबवर आक्रमक ठरले. भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर यश दायल याने एक विकेट घेतली आणि आरसीबीला फायनमध्ये विजय मिळवून दिला. विराट कोहलीसाठी हा क्षण अतिशय भावनिक होता. सामना जिंकताच विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि चेहरा खाली करून रडू लागला.
यादरम्यान विराट कोहलीचा आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावेळेस सगळे ट्रॉफी पाहत होते त्यावेळेस विराट कोहली देखील तिथे उपस्थित होता आणि तो चक्क लहान मुलासारख ट्रॉफीच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळाला. त्याने ट्रॉफीच झाकन उघडून त्यात काय आहे हे डोकावून पाहिलं. यावेळेस विराट अगदी लहान मुलासारखा दिसत होता. विराटसाठी ही ट्रॉफी खुप मौल्यवान आहे. त्यानं 18 वर्षांच्या वनवासानंतर या ट्रॉफीला आरसीबी संघासाठी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली जिंकलं आहे.