दलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याने अविस्मरणीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये आधीच आपल्या वेगवान माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या रोखणाऱ्या नबीने आता दलीप ट्रॉफीत ईस्ट झोनविरुद्ध केवळ 28 धावा देत 5 बळी घेतले. विशेष म्हणजे त्यापैकी सलग चार गडी त्याने केवळ चार चेंडूंवर बाद करत "डबल हॅटट्रिक"ची किमया साधली. दलीप ट्रॉफीच्या इतिहासात असे करणारा नबी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
हा अनोखा पराक्रम 53व्या षटकात घडला. आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर आकिब नबीने अर्धशतक झळकावलेला स्थिरावलेला फलंदाज विराट सिंग याला बाद केले. त्यानंतर लगेच मनीषीचा गडी टिपला. षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने मुख्तार हुसेनला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. एवढ्यावरच न थांबता नबीने पुढील षटकातील पहिल्याच चेंडूवर सूरज सिंधू जायसवालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत दुर्मिळ अशा डबल हॅटट्रिकची नोंद केली.
या सलग गड्यांमुळे ईस्ट झोनच्या डावाचा अचानकच कोसळता बुरुज झाला. संघ 222 धावांवर असताना विराट सिंग बाद झाला आणि त्यानंतर केवळ 8 धावांची भर घालत संपूर्ण संघ 230 धावांवर गारद झाला. नबीच्या या कहरानंतर हर्षित राणाने दोन आणि अर्शदीप सिंगने एक बळी घेतला.
आकिब नबीच्या या पराक्रमामुळे भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा चार चेंडूंवर चार बळी घेण्याचा विक्रम झाला आहे. 1988 साली दिल्लीच्या शंकर सैनीने हिमाचलविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 2018 मध्ये जम्मू-काश्मीरच्या मोहम्मद मुदहसिरने आणि मध्य प्रदेशच्या कुलवंत खेजरोलियाने हा पराक्रम साधला होता.
आता आकिब नबीने दलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच डबल हॅटट्रिक नोंदवत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. नबीच्या या अविश्वसनीय गोलंदाजीमुळे दलीप ट्रॉफीच्या रंगतदार सामन्यात रोमांचक वळण आले असून त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव होत आहे.