(IND vs UAE Asia Cup 2025) आशिया कप 2025 टी-20 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत मोहिमेला विजयी सुरुवात केली. ग्रुप-ए मधील या सामन्यात भारताने संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) 57 धावांवरच गारद करत सहज विजय मिळवला. या विजयामुळे भारताने गुणतालिकेत पहिले गुण मिळवले.
यूएईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला मोहम्मद वसीम आणि शराफू यांनी काही चांगले फटके मारले, मात्र जसप्रीत बुमराहने शराफूला बाद करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने जोहैबला माघारी धाडलं आणि यूएईचा डाव कोसळू लागला. मध्यंतरानंतर कुलदीप यादवने फिरकीच्या जोरावर चांगली खेळी केली. त्याने 2.1 षटकांत 7 धावा देत 4 गडी बाद केले. शिवम दुबेनेही 3 जणांना बाद केलं. अखेर संपूर्ण यूएई संघ 15.1 षटकांत 57 धावांवर बाद झाला.
अभिषेक शर्माने फक्त 15 चेंडूत 30 धावा ठोकत सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला. शुभमन गिलने 8 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवनेही चांगल्या धावा काढत भारताला फक्त 27 चेंडूतच विजय मिळवून दिला. भारताने हे लक्ष्य 4.3 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले.
या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कार मिळाला. भारताने केवळ विजयच मिळवला नाही, तर प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या टी-20 इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर रोखण्याची कामगिरीही केली.