आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब संघाने अंतिम फेरीत आरसीबीशी लढण्याचा मान पटकावला. मात्र, या सामन्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार बीसीसीआयच्या 'कोड ऑफ कंडक्ट'च्या उल्लंघनात अडकले आहेत.
सामन्यादरम्यान दोन्ही संघांकडून स्लो ओव्हर रेट म्हणजेच नियोजित वेळेत ओव्हर्स पूर्ण न होणे, हा नियम भंग झाला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या कर्णधारांवर कारवाई केली आहे. पंजाब संघाकडून यंदाच्या हंगामातील हा दुसरा उल्लंघनाचा प्रकार असल्याने श्रेयस अय्यरवर 24लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, पंजाब संघातील अन्य खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के इतका दंड आकारण्यात आला आहे. बीसीसीआयने अधिकृत निवेदनात याबाबत माहिती दिली आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाकडून या हंगामातील तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचे उल्लंघन झाले असून, त्यामुळे हार्दिक पंड्यावर 30 लाख रुपयांचा सर्वात मोठा दंड आकारण्यात आला आहे. संघातील अन्य खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. बीसीसीआयच्या कडेकोट नियमांमुळे संघांवर आणि कर्णधारांवर आर्थिक कारवाईच्या स्वरूपात परिणाम झाला आहे.