थोडक्यात
भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली महत्वाची माहिती
श्रीलंका सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना क्रॅम्प्सचा सामना करावा लागला
हार्दिक पंड्या हा सध्या वैद्यकीय पथकाच्या निगराणी खाली
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) अंतिम सामना रंगणार आहे. या कपविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये यंदा कोणताही जल्लोष दिसला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारकडे सर्वांनीच हा सामना न खेळण्या्ची मागणी केली होती. मात्र, याविषयीचा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप आहे. तर या स्पर्धेत दोन्ही संघ उद्या तिसऱ्यांदा आमने-सामने येतील. त्यापूर्वीच टीम इंडियाचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत.
अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा हे तीन खेळाडू जखमी झाल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिली. ऑलराऊंडर हार्दिक पंड्या हा श्रीलंका सामन्यात पहिले षटक टाकल्यानंतर मैदानाबाहेर पडला. अभिषेक शर्मा याच्या हाताचे दुखणे वाढले आहेत. तो ही या सामन्यावेळी मैदानाबाहेर पडला. तर तिलक वर्माला स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रास असह्य झाल्याची माहिती समोर येत आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार यादव याने ही माहिती दिली. श्रीलंका सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना क्रॅम्प्सचा सामना करावा लागला.
पाकिस्तानविरोधातील अंतिम सामन्यापूर्वी ही स्नायू दुखापत बरी होईल अशी आशा त्याने व्यक्त केली. हे सर्व खेळाडू तंदुरुस्त होऊन पाकिस्तानविरोधात मैदानात उतरतील अशी त्याला आशा आहे. भारत-श्रीलंका सामन्यानंतर भारतीय संघाचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या खेळाडूंच्या दुखापतीबाबत माहिती दिली. मॉर्केल यांच्या मते, या खेळाडूंना स्नायूची दुखापत झाली आहे. अभिषेक शर्मा या दुखापतीतून बाहेर आला आहे. तर, हार्दिक पंड्या हा सध्या वैद्यकीय पथकाच्या निगराणी खाली आहे.
सामन्यापूर्वी तो पण बरा होण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होण्याची दाट शक्यता आहे. तिलक वर्मा हा तंदुरुस्त होईल की नाही याविषयीची माहिती मॉर्केल यांनी दिली नाही. दरम्यान, उद्या रविवारी, 28 सप्टेंबर 2025 पूर्वी मैदानात चमकदार कामगिरी बजावतील अशी आशा आहे.