सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम चांगलाच जोर धरुन आहे. ज्यामध्ये गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज हे संघ वर्चस्व गाजवत आहेत. प्रत्येक सामन्यादरम्यान काही तरी आश्चर्यकारक पाहायला मिळत. यादरम्यान एक वेगळीचं गोष्ट सध्या सोशल मीडियावर आणि आयपीएलच्या सामन्यादरम्यान चर्चेत आली आहे.
ती म्हणजे, चंपक... चंपक नाव कानावर पडलं की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो तारक मेहता का उल्टा चश्मामधील चंपकलाल गडा, म्हणजेच बापूजी. हा चंपक कोणी व्यक्ती नसून एक रोबो डॉग आहे. हा चंपक रोबो डॉग रिमोटद्वारे नियंत्रित करता येतो. या रोब डॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
तसेच यासंबंधीत तारक मेहता का उल्टा चश्मामधील चंपकलाल गडाचे फोटो आणि मालिकेतील काही सीन्स घेऊन मीम्स देखील तयार केले जात आहेत. क्रिकेटर्स आणि या रोबोट डॉगच्या मजेदार स्टंटमुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चंपकसोबत क्रिकेटर्स देखील रमून खेळताना दिसतात. नुकताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यासोबतचा चंपकचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
रोबो डॉगला चंपक नाव कसं पडलं?
आयपीएलमधील हा रोबोट डॉग चालू शकतो, धावू शकतो, उडी मारू शकतो आणि अगदी दोन पायांवर उभाही राहू शकतो. तसेच त्यात एक कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयपीएलकडून अनेक दिवसांपासून याच नाव काय ठेवायचं असा विचार सुरु होता. त्यासाठी बडी, जॅफा, चुलबूल आणि चंपक या चार नावांचे पर्याय चाहत्यांसमोर ठेवून वोटिंग घेण्यात आले. त्यानंतर चंपक या नावाला बहुमत मिळाल्याने 20 एप्रिल रोजी या रोबोट डॉगचे नाव चंपक ठेवण्यात आलं.