अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येत आहे. 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान तो भारतात थांबणार असून कोलकाता, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात एक अनोखा क्रिकेट इव्हेंटही आयोजित करण्यात आला आहे.
14 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एक विशेष क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्यात मेस्सी बॅट हातात घेऊन विराट कोहली, रोहित शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांसोबत मैदानात उतरणार आहे. सात खेळाडूंच्या या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन एका खास कार्यक्रमाच्या रूपात करण्यात आले असून, प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
2011 च्या वर्ल्ड कप फायनलचा साक्षीदार ठरलेल्या वानखेडे स्टेडियमवर आता जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टारपैकी एक असलेल्या मेस्सीचा बॅटिंग अंदाज पाहता येणार आहे, ही संधी प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. क्रिकेट आणि फुटबॉल या दोन लोकप्रिय खेळांचा संगम यानिमित्ताने एकाच स्टेजवर पाहायला मिळणार आहे.
याच दौऱ्यात कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये मेस्सीचा औपचारिक सन्मान करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोलकातामध्येच मेस्सी लहान मुलांसाठी ‘फुटबॉल वर्कशॉप’ आणि ‘फुटबॉल क्लिनिक’ चे उद्घाटन करणार असून, त्याच्या सन्मानार्थ ‘GOAT Cup’ या विशेष फुटबॉल स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे.
दरम्यान, केरळ सरकारने याआधीच घोषणा केली होती की, अर्जेंटिना फुटबॉल संघ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर एक फ्रेंडली सामना खेळणार आहे. यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली असून, लवकरच अधिकृत तारखेची घोषणा होणार आहे.
लिओनेल मेस्सी याने शेवटचा भारत दौरा 2011 मध्ये केला होता, जेव्हा त्याने कोलकातामध्ये वेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याला भारतात पाहण्याची संधी मिळणार असून, हा क्षण फुटबॉलप्रेमींसाठी आणि सर्वच क्रीडाप्रेमींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. फुटबॉलचा दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट विश्वातील तारे एकाच मंचावर येत असल्याने हा कार्यक्रम देशभरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. वानखेडेवर रंगणारा हा सामना प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये कायम कोरला जाणार, यात शंका नाही.