भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) हॉल ऑफ फेममध्ये 2025 साठी स्थान देण्यात आले आहे. धोनीसोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा क्लासिक फलंदाज हाशिम आमलाचा देखील हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी एकूण सात खेळाडूंना ज्यात पाच पुरुष आणि दोन महिला हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीने धोनीबाबत सांगताना म्हटले आहे की, "दडपणाखाली शांत राहण्याची विलक्षण क्षमता, डावपेचांची तीव्र जाण आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणणारा खेळाडू म्हणून धोनीचा वारसा अजरामर आहे. उत्तम फिनिशर, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे."
यानंतर धोनीने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, "हॉल ऑफ फेममध्ये नाव झळकणे ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. अनेक महान खेळाडूंसोबत माझे नाव जोडले जाणे, ही गोष्ट मी आयुष्यभर जपून ठेवेन. क्रिकेटमधील माझ्या योगदानाला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान मी नम्रपणे स्वीकारतो."
धोनीने भारतासाठी एकूण 538 सामने खेळले. तसेच 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 17,266 धावा केल्या आहेत. 829 विकेटमागे बाद करत त्याने आपले विकेटकिपर कौशल्य दाखवले आहे. ही आकडेवारी केवळ उत्कृष्टतेची नाही, तर त्याच्या सातत्य, फिटनेस आणि दीर्घकालीन कारकिर्दीची साक्ष देते. या हॉल ऑफ फेममुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.