इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाच्या सराव सत्रात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. अनकॅप्ड स्पिनर हरप्रीत ब्रारने टीमसोबत नेट्समध्ये सराव केला. विशेष म्हणजे त्याची अधिकृत निवड संघात झालेली नसतानाही तो सराव सत्रात सहभागी झाला. या संदर्भात हरप्रीतने खुलासा केला आहे की कर्णधार शुबमन गिलच्या आग्रहामुळेच तो संघासोबत नेट्समध्ये सहभागी झाला.
हरप्रीत सध्या युनायटेड किंगडममध्ये आपल्या कुटुंबासोबत आहे. त्याची पत्नी स्वीडनमध्ये राहते, आणि बर्मिंगहॅम हे ठिकाण त्यांच्या घरापासून अवघ्या दीड तासांच्या अंतरावर आहे. शुबमन गिलने त्याला संदेश पाठवत सरावासाठी आमंत्रित केलं आणि त्याने ही संधी स्वीकारली. बीसीसीआयनेही हरप्रीतचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत त्याच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झाला होता. भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु इंग्लंडने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. भारतीय फिल्डिंगमध्ये अनेक चुका झाल्या; विशेषतः 8 कॅचेस गाळण्यात आले. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या, पण दुसऱ्या डावात त्याला साथ मिळाली नाही. दुसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे.