क्रिकेट

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास किती नुकसान? आर्थिक संकटाचं सावट

आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्यामुळे जागतिक क्रिकेटवर मोठ्या आर्थिक संकटाचं सावट निर्माण झालं आहे.

Published by : Varsha Bhasmare

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा केवळ एक खेळ नसून तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा आर्थिक ब्रँड मानला जातो. मात्र, आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्यामुळे जागतिक क्रिकेटवर मोठ्या आर्थिक संकटाचं सावट निर्माण झालं आहे. पाकिस्तान सरकारने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार होता. मात्र, पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याची भूमिका घेतली आहे. पाकिस्तान संघ संपूर्ण स्पर्धेत सहभागी होईल, मात्र भारताविरुद्ध मैदानात उतरणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे अंदाजे 4500 कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत-पाकिस्तान सामना हा कोणत्याही वर्ल्ड कपमधील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना असतो. या एकाच सामन्यामुळे आयसीसी, प्रसारमाध्यम संस्था, प्रायोजक आणि संबंधित क्रिकेट बोर्डांना प्रचंड आर्थिक फायदा होतो. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ही मॅच खेळवली गेली नाही, तर संपूर्ण स्पर्धेच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होऊ शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं अंदाजित आर्थिक मूल्य सुमारे 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 4500 कोटी रुपये आहे. या रकमेमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रक्षेपण हक्क, प्रीमियम जाहिराती, मोठ्या कंपन्यांचं प्रायोजकत्व, तिकीट विक्री आणि कायदेशीर सट्टेबाजीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. जगातील कोणताही अन्य सामना या कमाईची बरोबरी करू शकत नाही.

विशेषतः जाहिरातीतून होणारी कमाई ही सर्वाधिक असते. भारत-पाकिस्तान सामन्यात केवळ जाहिरातीतून सुमारे 300 कोटी रुपयांची उलाढाल होते. या सामन्यात 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी 25 ते 40 लाख रुपये मोजावे लागतात, जो स्पर्धेतील सर्वात महागडा जाहिरात स्लॉट मानला जातो. सामना रद्द झाल्यास प्रसारमाध्यमांना मोठा फटका बसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या निर्णयामुळे दोन्ही संघांना मिळून जवळपास 200 कोटी रुपयांचं थेट नुकसान होऊ शकतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही (PCB) या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून पीसीबीला एकूण उत्पन्नाच्या सुमारे 5.75 टक्के हिस्सा मिळतो. याचं मूल्य सुमारे 34.51 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 316 कोटी रुपये आहे. भारताविरुद्ध सामना न झाल्यास ही रक्कम धोक्यात येऊ शकते.

याशिवाय, भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं इतर सामन्यांच्या तुलनेत महाग असतात आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सामना रद्द झाल्यास तिकीट खरेदी केलेल्या प्रेक्षकांना पैसे परत द्यावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताविरुद्ध सामना न खेळण्याच्या निर्णयावरून आयसीसी पाकिस्तानवर कठोर कारवाई करू शकते, अशी चर्चा आहे. येत्या 48 तासांत आयसीसीकडून या प्रकरणावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा