थोडक्यात
ICCने घेतला मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अमेरिकन क्रिकेट संघाचे सदस्यत्व निलंबित केलं
USA क्रिकेटकडून सातत्याने जबाबदाऱ्यांचं उल्लंघन
(ICC) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अमेरिकन क्रिकेट संघाचे सदस्यत्व निलंबित केलं आहे. आयसीसीच्या मते, युएसए क्रिकेटने संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि संविधानातील अटींचं वारंवार उल्लंघन केलं आहे.आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संस्थेकडून योग्य शासनरचना उभारण्यात अपयश, अमेरिकन ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक समितीकडून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक प्रगती न होणे, तसेच अमेरिकेत व जागतिक स्तरावर क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का बसणे या मुद्द्यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला.
याआधी, जुलै महिन्यात आयसीसीनं युएसए क्रिकेटला तीन महिन्यांत स्वतंत्र आणि पारदर्शक निवडणुका घेणे व सुधारणा अंमलात आणा असा अंतिम इशारा दिला होता. मात्र, तो पाळण्यात न आल्यामुळे आता निलंबनाचा निर्णय घेण्यात आला असून ही कारवाई अशा काळात झाली आहे जेव्हा युएसए क्रिकेटने नुकताच अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायजेस (ACE) यांच्यासोबतचा 50 वर्षांचा व्यापारी करार रद्द केला.
या करारानुसार एसीईला अमेरिकेत एलिट टी-20 क्रिकेटवरील हक्क देण्यात आले होते. मात्र, आर्थिक देणी, स्टेडियम उभारणी व प्रशासनात हस्तक्षेप यांवरून वाद वाढला आणि संबंध तोडले गेले.
आयसीसीनं स्पष्ट केले आहे की, अमेरिकेचे राष्ट्रीय संघ आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी राहतील. लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकची तयारीही सुरू राहणार आहे. सदस्यत्व पुन्हा मिळवण्यासाठी आयसीसीनं विशेष ‘नॉर्मलायझेशन कमिटी’ नेमली आहे. ही समिती युएसए क्रिकेटला सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि त्यांची प्रगती तपासेल.