भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत, जो सध्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामना गाजवाता दिसत आहे. त्याचा झालेला कमबॅक मोठ्या मोठ्यांना लक्षात ठेवणारा ठरला आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. दिल्ली-डेहराडून महामार्गावर मंगलौरजवळ त्याची मर्सिडीज डिव्हायडरला धडकली. ज्यात गाडीला आग लागली आणि पंतला अनेक जखमा झाल्या. या अपघातानंतर ऋषभ पंतचा सर्वात मोठा कमबॅक आता सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात पाहायला मिळत आहे.
पंत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने 134 आणि 118 अशी दोन आक्रमक शतके झळकावली. मात्र भारताला 371 धावांचे रक्षण करण्यात अपयश आले आणि संघाला पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला. डावखुरा पंत इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करत आला आहे. त्याने 10 कसोटींतील 19 डावांमध्ये 808 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 42.52 असून त्यात चार शतके आणि दोन अर्धशतके आहेत. एजबॅस्टनवरील त्याची सर्वोत्तम खेळी म्हणजे 146 धावा.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एजबॅस्टनवर ऋषभ पंतने शतक झळकावल्यास, तो डॉन ब्रॅडमन, राहुल द्रविड आणि ब्रायन लारासारख्या महान फलंदाजांच्या यादीत सामील होईल. ही कसोटी 2 जुलैपासून सुरू होणार आहे. जुलै 2022 मध्ये एजबॅस्टनवर झालेल्या कसोटीत, पंतने केवळ 111 चेंडूंमध्ये 19 चौकार आणि 04 षटकारांच्या सहाय्याने 146 धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजासोबत भागीदारी करत त्याने 98/5 या कठीण स्थितीतून भारताला 416 पर्यंत नेले होते. मात्र इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य गाठत सामना जिंकला.
जर यंदाही पंत एजबॅस्टनवर शतक ठोकतो, तर तो इंग्लंडमध्ये सलग तीन कसोट्यांमध्ये शतके करणारा सातवा परदेशी फलंदाज ठरेल. याआधी ही कामगिरी डॉन ब्रॅडमन, वॉरेन बार्डस्ली, चार्ल्स मॅकार्टनी (ऑस्ट्रेलिया), राहुल द्रविड (भारत), ब्रायन लारा (वेस्ट इंडीज) आणि डॅरेल मिचेल (न्यूझीलंड) यांनी केली आहे. द्रविडनंतर ही कामगिरी करणारा पंत दुसरा भारतीय ठरेल. 2002 मध्ये द्रविडने नॉटिंगहॅममध्ये 115 लीड्समध्ये 148 आणि ओव्हलवर 217 धावा करून हा विक्रम केला होता. डॅरेल मिचेलने 2022 मध्ये लॉर्ड्स (108), नॉटिंगहॅम (190) आणि लीड्स (109) मध्ये सलग तीन शतके ठोकली होती.
ऋषभ पंतने याआधीच अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने एम.एस. धोनीचा विक्रम मोडून SENA देशांमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय यष्टीरक्षक बनण्यासोबतच, या देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई यष्टीरक्षकही ठरला आहे. लीड्समध्ये एकाच कसोटीत दोन शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरण्याचा मानही त्याने पटकावला आहे. दुसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पंत आपली शानदार कामगिरी कायम ठेवतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीकरिता संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेटेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स.