थोडक्यात
भारताची फायनलमध्ये धडक
भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय
प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा उभारल्या
(India vs Bangladesh) आशिया कप टी20 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीत भारताने दमदार कामगिरी करत बांगलादेशचा 41 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला असून, हा त्यांचा सलग पाचवा विजय ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा उभारल्या. डावाच्या सुरुवातीला काही फलंदाजांनी निराशा केली, मात्र डाव सावरण्याची जबाबदारी अभिषेक शर्माने घेतली. त्याने 75 धावांची आक्रमक खेळी केली, ज्यात 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. त्याला हार्दिक पंड्या (38) आणि शुभमन गिल (29) यांनी साथ दिली. शेवटी अक्षर पटेलने नाबाद 10 धावांचे योगदान देत भारताचा स्कोर मजबूत केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव भारतीय गोलंदाजांनी मोडीत काढला. 169 धावांच्या आव्हानासमोर त्यांची फलंदाजी 19.3 षटकांत 127 धावांवर आटोपली. सैफ हसनैनने सर्वाधिक 69 धावा करत झुंजार प्रयत्न केला, तर परवेझ इमोनने 21 धावा जोडल्या. मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर ठसा उमटवता आला नाही.
भारतीय गोलंदाजांत कुलदीप यादव सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने 3 गडी बाद केले. वरुण चक्रवर्तीने 2 बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि तिलक वर्माला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाजांना टिकून राहणे कठीण गेले.
या विजयासह भारताने सुपर-4 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. त्यापूर्वी गट-साखळीतही त्यांनी यूएई, पाकिस्तान आणि ओमानवर मात केली होती.