भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर केवळ संघाच्या कामगिरीवरच नव्हे, तर माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या एका वादग्रस्त विधानामुळे मोठी चर्चा रंगली आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजेीम इंडियाची तुलना चक्क डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याशी केली आहे.
दिनेश कार्तिकचं 'डॉबरमॅन' विधान आणि वाद
सामन्यानंतर स्काय स्पोर्ट्सवरील चर्चेत कार्तिकने एका व्हायरल ट्विटचा संदर्भ देत म्हटलं की, "टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅन कुत्र्यासारखी आहे. डोकं (टॉप ऑर्डर) चांगलं, मधला भाग (मिडल ऑर्डर) ठीक, पण शेपूट नाही." डॉबरमॅनला शेपूट नसते, त्याचप्रमाणे भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांना कोणताही ठोस योगदान देता आलं नाही, असं त्याचं म्हणणं होतं. या विधानामुळे सोशल मीडियावर टीका आणि समर्थनाचं वादळ उठलं आहे.
यानंतर पराभवाच्या पार्शवभूमीवर कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये त्याने थेट क्रिकेटप्रेमींना प्रश्न विचारले. तो म्हणाला, "835 धावा, 5 शतके असूनही आपण सामना हरतो, हे चिंतेचं आहे. बुमराहला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही का? फिल्डिंगमध्ये चुका झाल्या का? का टेलएंडर्स अपयशी ठरले? कमेंटमध्ये मला सांगा. मी वाट पाहिन." या स्टेटमेंटने चाहत्यांमध्ये चर्चेचा नवा मुद्दा दिला असून, सोशल मीडियावर याचे विविध पैलूंवर प्रतिसाद उमटत आहेत. काही चाहत्यांनी कार्तिकच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे, तर काहींनी अशी तुलना 'असंसदीय' असल्याचे म्हटले आहे.
टीम इंडियाची कामगिरी
भारताने या कसोटीत दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल 835 धावा केल्या. यामध्ये 5 शानदार शतके झळकावली गेली. पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल तर दुसऱ्या डावात केएल राहुल, ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. मिडल ऑर्डरमध्ये पंतने दोन्ही डावांमध्ये मोठी कामगिरी करत संयम दाखवला. मात्र तरीही इंग्लंडने सामना 5 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 6 विकेट्सवर 453 धावा केल्या होत्या, पण शेवटच्या 4 फलंदाजांनी मिळून फक्त 18 धावा केल्या. दुसऱ्या डावात तर केवळ 33 धावांत 6 विकेट्स पडल्या. याउलट इंग्लंडच्या शेवटच्या 5 फलंदाजांनी पहिल्या डावात 189 धावा केल्या. या तुलनेत भारतीय संघ अपयशी ठरल्याचं स्पष्ट दिसलं.