आशिया कप 2025 स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर आता स्पर्धेतील चार बलाढ्य संघ सुपर-4 फेरीत आमनेसामने भिडणार आहेत. या फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताचा सामना त्याचा परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे ओपनिंग जोडीदार म्हणून उतरतील. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर, तर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन मधल्या फळीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील. खालच्या क्रमांकावर हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल संघाला मजबुती देतील. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीची जोडी पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्याचे काम करेल.
हा रोमांचक सामना रविवार, 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार असून, रात्री 8 वाजता पहिल्या चेंडूला सुरुवात होईल. ओमानविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात भारताने हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांना संधी दिली होती. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या लढतीत टीम मॅनेजमेंट दोन मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. बुमराह आणि रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती या सामन्यात संघात परतण्याची शक्यता आहे.
21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध लढत संपल्यानंतर भारत 24 सप्टेंबरला बांग्लादेशविरुद्ध आणि 26 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. ही तिन्ही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरच होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे.
आजच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय प्लेईंग 11 संघ :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.