थोडक्यात
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.
या यशामागे महिला खेळाडूंचा मोठा संघर्ष दडलेला आहे
संघासाठी निधी नव्हता, सुविधा नव्हत्या आणि समाजातही उदासीनता होती
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. पण या यशामागे महिला खेळाडूंचा मोठा संघर्ष दडलेला आहे. सुरुवातीच्या काळात महिला क्रिकेटकडे फारशी दखल घेतली जात नव्हती. संघासाठी निधी नव्हता, सुविधा नव्हत्या आणि समाजातही उदासीनता होती. त्या काळात महिला क्रिकेटपटूंना अत्यंत कठीण परिस्थितीत खेळावे लागत होते. अनेकदा त्यांना फरशीवर झोपावे लागायचे, प्लास्टिकच्या कपात डाळभात खावा लागायचा. वीस खेळाडूंसाठी फक्त चार टॉयलेटची सोय असायची. स्वतंत्र खोली, चांगले जेवण किंवा प्रवासासाठी सोयी-सुविधा ही स्वप्नवत गोष्ट होती.
भारतीय महिला क्रिकेट परिषदेच्या (WCAI) तत्कालीन सचिव नुतन गावस्कर यांनी जुन्या आठवणी सांगताना म्हटलं की, "त्या काळात निधी मिळवणे खूप अवघड काम होतं. परदेश दौऱ्यासाठी विमानाच्या तिकिटांसाठीही प्रायोजक शोधावे लागत. एनआरआय पालक मदत करायचे, तर अभिनेत्री मंदिरा बेदी आणि एअर इंडियानेही अनेक वेळा विमानतळ खर्च उचलला होता."b
शांता रंगास्वामी आणि नुतन गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेट संघाने प्रतिकूल परिस्थितीतही आपला प्रवास सुरू ठेवला. 1973 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय महिला क्रिकेट परिषदेने या संघाला आकार दिला. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारतीय महिला संघाने जगभरात आपली छाप पाडली आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा यांसारख्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने भारताला अभिमान वाटावा असा टप्पा गाठला आहे.
प्लास्टिकच्या कपात डाळभात खाण्यापासून ते विश्वचषक जिंकण्याच्या उंबरठ्यापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा प्रवास संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ठरला आहे. आज जर भारत विजयी झाला, तर तो फक्त एका सामन्याचा विजय नसेल, तर त्या दशकभर चाललेल्या संघर्षाला मिळालेला सन्मान असेल.