आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने केवळ जेतेपदावर आपलं नाव कोरलं नाही, तर गतविजेतेपदाची मालिका कायम ठेवली.
स्पर्धेत संपूर्ण काळात भारताचा आक्रमक पवित्रा पाकिस्तानविरुद्ध स्पष्टपणे दिसून आला. गटफेरीत ‘नो हँडशेक पॉलिसी’मुळे चर्चेत आलेल्या भारतीय संघाने अंतिम लढतीतही तोच पवित्रा कायम ठेवला. पाकिस्तानने सामन्यांनंतर तक्रारींचा पाढा वाचला, अंपायरिंगपासून वेळापत्रकापर्यंत आक्षेप घेतले, पण मैदानावर त्यांना भारतासमोर लाजिरवाणी स्थितीला सामोरं जावं लागलं.
अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर खरी नाट्यमय घटना पार पडली ती बक्षीस समारंभात. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी स्पष्ट नकार दिला. सामनावीर व मालिकावीराचा सन्मान पार पडला, परंतु जेतेपदाची ट्रॉफी स्वीकारताना भारतीय संघाने नकवींच्या उपस्थितीत कोणताही सहभाग दाखवला नाही.
या भूमिकेमुळे संपूर्ण स्टेडियममध्ये काही क्षण तणावाचं वातावरण निर्माण झालं. नकवींचा चेहरा पडल्यासारखा झाला आणि भारतीय संघाने आपली भूमिका अधिक ठामपणे स्पष्ट केली. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाचं कौतुक करत, पाकिस्तानला त्याच्या लायकीप्रमाणे उत्तर दिल्याचं नमूद केलं. भारताचा हा विजय केवळ आशिया कपचे विजेतेपद मिळवण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर पाकिस्तानविरुद्ध मैदानाबाहेरही ठाम संदेश देणारा ठरला.