भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चुरशीचा ठरला. भारताने पहिल्या डावात 471 धावांची भक्कम आघाडी घेतली, मात्र शेवटचे सात गडी केवळ 41 धावांमध्ये गमावल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने देखील आक्रमक सुरुवात केली. अवघ्या 4 धावांवर पहिला गडी गमावल्यानंतर बेन डकेट आणि ओली पोप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
यामध्ये भारतासाठी एक महत्त्वाची संधी हुकली. सामन्याच्या सातव्या षटकात डकेटने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर बॅकवर्ड प्वाइंटच्या दिशेने फटका मारला. त्यावेळेस चेंडू थेट रवींद्र जडेजाकडे गेला. झेल टिपण्याची संधी असतानाही, जडेजाकडून हा झेल सुटला. त्यावेळी डकेट फक्त 15 धावांवर होता, परंतु या संधीचा फायदा घेत त्याने पुढे 62 धावांची खेळी करत भारतावर दडपण वाढवलं.
त्यामुळे भारताला 47 अतिरिक्त धावांचा फटका बसला. केवळ क्षेत्ररक्षणातच नव्हे, तर फलंदाजीतही जडेजा अपयशी ठरला. तो फक्त 11 धावा काढून जोश टंगच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. त्याच्याकडून अपेक्षा मोठ्या होत्या. आता त्याची गोलंदाजीतली भूमिका कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.