न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारतीय भूमीवर इतिहास रचला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 41 धावांनी मात करत 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही न्यूझीलंडची पहिलीच वेळ ठरली असून, यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस भाग पाडले होते. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत न्यूझीलंडचे दोन झटपट फलंदाज बाद केले. मात्र त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. भारताने ही जोडी फोडली खरी, पण त्यानंतर डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी द्विशतकी विक्रमी भागीदारी करत सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं.
डॅरेल मिचेलने संयमी पण आक्रमक खेळी करत 137 धावा केल्या, तर ग्लेन फिलिप्सने 106 धावांची शतकी खेळी साकारली. या दोघांच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 337 धावांचा भक्कम डोंगर उभारला. भारतासाठी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र रोहित 11 धावा करून बाद झाला, तर शुबमन गिल 23 धावांवर आऊट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर (3) आणि केएल राहुल (1) स्वस्तात माघारी परतल्याने भारताची अवस्था 4 बाद 71 अशी झाली.
अडचणीत सापडलेल्या भारताला विराट कोहली आणि नितीश कुमार रेड्डी यांनी सावरले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नितीशने 53 धावांची खेळी करत आपले पहिलेच एकदिवसीय अर्धशतक झळकावले. मात्र नितीश आऊट होताच ही भागीदारी तुटली. रवींद्र जडेजा पुन्हा एकदा अपयशी ठरत 12 धावांवर बाद झाला.
यानंतर विराट कोहलीला हर्षित राणा याने चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी आक्रमक खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. विराटने आपल्या कारकिर्दीतील 54 वे एकदिवसीय शतक झळकावले, तर हर्षित राणाने 43 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. मात्र हर्षित बाद होताच न्यूझीलंडने सामन्यावर पकड मजबूत केली.
हर्षितनंतर आलेला मोहम्मद सिराज पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहली कुलदीप यादवसह विजयासाठी प्रयत्न करत होता, मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कॅचआऊट झाला. विराटने 124 धावांची झुंजार खेळी केली, पण ती अपुरी ठरली. अखेर भारताचा डाव 46 षटकांत 296 धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने सामना तसेच मालिका आपल्या नावावर करत ऐतिहासिक विजय साजरा केला.