टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने 4 जून रोजी लखनऊमध्ये आपल्या बालपणीच्या मैत्रीणी वंशिकासोबत साखरपुडा केला आहे. सेंट्रम या ठिकाणी पार पडलेल्या या खास कार्यक्रमाला क्रिकेट क्षेत्रातील अनेक सहकारी उपस्थित होते, ज्यामध्ये रिंकू सिंहचाही समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका एलआयसी LICमध्ये कार्यरत असून ती कानपूरची रहिवासी आहे. कुलदीप आणि वंशिकाचे कुटुंबीय या नात्याबाबत सकारात्मक होते आणि दोन्ही बाजूंनी संमतीने हा सोहळा पार पडला.
सध्या कुलदीप भारताच्या कसोटी संघाचा भाग असून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तो सज्ज आहे. नुकत्याच संपलेल्या IPL 2025 हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सक खेळला होता. त्यांच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचता आलं नाही, तरी कुलदीपने चांगली कामगिरी केली. त्याने 14 सामन्यांत 15 बळी घेतले आणि त्याची इकॉनॉमी 7.07 इतकी होती. दिल्लीने त्याला 13.25 कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते.
पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कुलदीपने वैवाहिक आयुष्याची सुरुवात करण्याविषयी माहिती दिली होती. त्यावेळी त्याने नमूद केलं होतं की योग्य वेळ आली की लग्न होईल. सध्या तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळतो असून इंग्लंड दौऱ्यावर रवींद्र जडेजानंतरचा प्रमुख फिरकीपटू ठरेल. त्याने आत्तापर्यंत 13 कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.