थोडक्यात
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची जसप्रीत बुमराहवर टीका
बुमराहकडून सोशल मीडियावर पोस्ट करत कैफा थेट उत्तर
बुमराहच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नेहमीच आपल्या अनोख्या गोलंदाजीसाठी चर्चेत असतो. सध्या तो आशिया कपमध्ये खेळत असताना त्याच्या षटकांच्या नियोजनावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने प्रश्न उपस्थित केला. पण बुमराहनेही कैफच्या या वक्तव्याला थेट उत्तर देत सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
कैफने एका मुलाखतीत सांगितले की, “रोहित शर्मा कर्णधार असताना बुमराहला महत्त्वाच्या टप्प्यांवर – म्हणजेच 1वा, 13वा, 17वा आणि 19वा षटक दिला जात असे. मात्र, आता तो सुरुवातीलाच तीन षटके टाकतोय, जे संघाच्या रणनीतीसाठी धोकादायक ठरू शकते. असे केल्यास शेवटच्या षटकांत त्याचा प्रभाव कमी होतो आणि मोठ्या स्पर्धेत याचा फटका भारताला बसू शकतो.”
कैफच्या या विधानावर बुमराह शांत न राहता त्याला प्रत्युत्तर दिलं. सोशल मीडियावर रिपोस्ट करताना तो म्हणाला, “तुम्ही आधीही चुकीचे होता आणि यावेळीही तसंच आहे.” त्याच्या या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. काहींनी कैफचं मत योग्य ठरवलं, तर काहींनी बुमराहच्या धडाकेबाज उत्तराचं कौतुक केलं.
आशिया कपमध्ये बुमराहने आतापर्यंत 4 सामन्यांत 5 बळी घेतले आहेत. ओमानविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. स्पर्धेनंतर तो वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही उतरतोय, त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कैफच्या वक्तव्यावर दिलेल्या बुमराहच्या प्रतिक्रियेमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला असून, चाहत्यांमध्येही या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.