आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. यादरम्यान आज होणाऱ्या सामन्यात फटाक्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडू आणि पंच हातावर पट्टे बांधतील.
तसेच हल्ल्यात जीव गमावलेल्या निरागस लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार पॅट कमिन्स आणि हार्दिक पंड्या हे सामना सुरु होण्याआधी एक मिनिट शांतता देखील पाळणार आहेत. जम्मू-काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपुर्ण देशभरात सामूहिक दुःखाचे उदास वातावरण जाणवत आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान पंच शोक व्यक्त करण्यासाठी काळ्या पट्ट्या बांधतील. तसेच सामन्यात चीअरलीडर्स किंवा आतषबाजी होणार नाही. त्याचसोबत एक मिनिट शांतता देखील पाळली जाईल.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.
काल पहलगाममध्ये दहशदवाद्यांकडून धर्म विचारुन हल्ला
काल जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी नावे विचारून हिंदू नाव समोर आल्याबरोबर अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले असून दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक वेळा गोळीबार केला. तसेच या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. जम्मू काश्मीर मधील दहशत वादी हल्ल्यात पुण्यातील कर्वेनगर भागातील दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती.
तसेच काल झालेल्या हल्ल्यात अनेक सेलिब्रिटींकडून निषेद करण्यात आला असून भारतीय क्रिकेटर्सने देखील यासंबंधी हळहळ व्यक्त केली आहे. यादरम्यान हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कुलदीप यादव, सुर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, तिलक वर्मा या खेळाडूंनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत स्टोरी ठेवत निषेद व्यक्त केला आहे.