ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पराभवानंतर फिटनेसच्या समस्या नसल्यास आपल्या सर्व करारबद्ध खेळाडूंना BCCIने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास अनिवार्य केलं आहे. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट विराट कोहली पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास तयार झाले आहेत. रणजी ट्रॉफी 2024-2025 चा हंगाम यावेळी दोन भागात विभागून आयोजित केला आहे. रणजी ट्रॉफीची पहिली फेरी 11 ऑक्टोबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पार पडली होती. यादरम्यान आता दुसरी फेरी 23 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरी नंतर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत साखळी सामने खेळवले जाणार आहेत.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरविरुद्ध सामना
त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळणार आहेत. तसेच शुभमन गिल पंजाबकडून आणि ऋषभ पंत दिल्लीकडून रणजी सामना खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील दिल्लीविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या हंगामातील सामने फारच रोमांचक असणार आहेत. रणजी ट्रॉफी 2024-2025 मध्ये एकुण 38 संघांची पाच गटात विभागणी करण्यात आली असून चार एलिट गट आहेत. त्या प्रत्येक गटात 8 संघ आहेत. तसेच उर्वरित 6 संघांना वेगळ्या प्लेट गटात ठेवण्यात आले आहे.
रणजी ट्रॉफी 2024-2025 साठी तयार केलेल गट
एलिट ( A) : मुंबई, बडोदा, सेवा दल, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, महाराष्ट्र, ओडिशा, मेघालय
एलिट (B) : विदर्भ, आंध्र, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, पाँडिचेरी, हिमाचल प्रदेश, हैदराबाद
एलिट (C) : मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार
एलिट (D) : तामिळनाडू, सौराष्ट्र, रेल्वे, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, आसाम, चंदीगड
प्लेट : गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.