भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंह याला कुख्यात अंडरवर्ल्ड गँग 'डी-कंपनी'च्या नावाने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मोहम्मद दिलशाद उर्फ नौशाद या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नौशाद याने काही दिवसांपूर्वी एनसीपी नेते आणि दिवंगत मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी याला देखील अशाच पद्धतीने धमकी दिली होती.
इव्हेंट मॅनेजरला ई-मेलद्वारे धमकी
मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने रिंकू सिंहच्या इव्हेंट मॅनेजरला ई-मेलद्वारे धमकी दिली होती. त्या ई-मेलमध्ये स्वत:ला डी-कंपनीचा सदस्य असल्याचे सांगत, 10 कोटी रुपये न दिल्यास रिंकूचा जीव घेण्याची धमकी देण्यात आली होती. या ई-मेलमधून केवळ खंडणीची मागणीच नव्हे, तर गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. आरोपीने डी-कंपनीच्या नावाचा वापर करून पोलिस तपासाची दिशा बदलवण्याचा डाव रचला होता.
जीशान सिद्दीकीलाही अशाच प्रकारे धमकी
एप्रिल 2025 मध्ये जीशान सिद्दीकी याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, त्याला ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्या ई-मेलमध्ये असे म्हटले होते की, जर त्यांनी पैसे दिले नाहीत, तर त्यांचेही अंजाम त्यांच्या वडिलांप्रमाणेच होईल. ही ई-मेल्स 19 ते 21 एप्रिलदरम्यान पाठवण्यात आल्या होत्या.
त्रिनिदाद आणि टोबैगोमधून आरोपीचा प्रत्यार्पण
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी मोहम्मद दिलशाद नौशाद याला त्रिनिदाद आणि टोबैगो येथून भारतात प्रत्यार्पित केले. तो बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असून, त्याचे अंडरवर्ल्डशी असलेले कथित संबंध तपासात समोर येत आहेत.