थोडक्यात
भारतीय महिला संघानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
विश्वचषक पटकवताच हिटमॅन रोहित शर्मा भावुक
आभाळाकडे पाहत परमेश्वराचे मानले आभार
(Rohit Sharma) नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर महिला वनडे विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला गेला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५५ धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने महिला विश्वचषक 2025चं जेतेपद पटकावलं. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्व्हडार्टने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला.
भारताने जबरदस्त फलंदाजी करत दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अंतिम सामन्यात शेफालीने ८७ धावा केल्या, तर दीप्तीने ५८ धावा केल्या, भारताच्या विजयाच्या शिल्पकार शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ठरल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने चांगल्या धावांची भागीदारी रचली आणि भारताच्या फायनलमधील धावसंख्येत मोठी भूमिका बजावली.
भारताच्या या जबरदस्त खेळी समोर दक्षिण अफ्रिकेचा संघ 246 धावा करू शकला. अंतिम फेरीत शेफाली वर्माची खेळी महत्त्वाची ठरली. सलामीवीर स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली. अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचं आव्हान परतावून लावत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत जेतेपदाची कमाई केली.
रोहित शर्मादेखील भारतीय संघाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला होता. भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन होताच रोहित शर्मा आनंदी होऊन उभं राहत टाळ्या वाजवल्या अन् भावुक झाला. आभाळाकडे पाहत रोहित भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.