थोडक्यात
सिडनी वनडे- टीम इंडियाचा दणदणीत विजय
ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने केला पराभव
रोहित शर्माची दमदार नाबाद सेंच्युरी
तब्बल 10 किलो वजन घटवून स्वत:मध्ये आमुलाग्र कायापलाट घडवून आणणारा भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा याने शनिवारी सिडनीच्या मैदानावर आपण अजूनही बावनकशी सोनंच असल्याचं दाखवून दिले. गेल्या सामन्यात 74 धावा झळकावणाऱ्या रोहित शर्मा याने सलग दुसऱ्या सामन्यात संयमाने मोठी खेळी साकारत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. रोहित शर्मा याने 105 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कोहली आणि रोहितची दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी 130+ धावांची झाली. यासह, रोहित ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे.
रोहित शर्माचं एकदिवसीय कारकिर्दीतील 33 वे शतक
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 33 वे शतक झळकावले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 105 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शानदार शतक झळकावले. अॅडलेडमध्ये 73 धावांची शानदार खेळी करणाऱ्या रोहितने सिडनीमध्ये शानदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. रोहित शर्माचे हे या वर्षातील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. सिडनीमध्ये शतक झळकावल्यानंतर रोहितने त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ बांधणाऱ्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.