विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांनी इंग्लंड दौऱ्याआधी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना धक्का दिला. काही दिवसांच्या अंतराने आलेल्या या घोषणांमुळे चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता भारताचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी या निवृत्तीमागे मोठा दावा केला आहे.
घावरी यांच्या मते, विराट आणि रोहितने स्वइच्छेने नव्हे तर बीसीसीआय व निवड समितीच्या अंतर्गत राजकारणामुळे निवृत्ती घेतली. “विराट आणखी किमान दोन वर्ष कसोटी खेळू शकला असता. पण काही कारणांमुळे त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडलं गेलं. त्याहून धक्कादायक म्हणजे बीसीसीआयने विराटसारख्या दिग्गजाला अधिकृत निरोपही दिला नाही,” असं घावरी म्हणाले.
रोहितच्या निवृत्तीबाबतही घावरी यांनी तत्सम दावे केले. “रोहितला संघातून बाहेर होण्याची सूचना देण्यात आली होती. त्याची इच्छा नसतानाही त्याला निवृत्ती स्वीकारावी लागली,” असे ते म्हणाले. घावरींच्या या वक्तव्यांमुळे बीसीसीआयच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, रोहित-विराट जोडीने यापूर्वी 2024 वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता हे दोघे वनडे क्रिकेटमध्ये दिसतील, मात्र त्यांच्या वनडे निवृत्तीबाबतही चर्चेला उधाण आले आहे.