27 मे 2025 ला लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आमने सामने आले. या अंतिम साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) संघाने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध जबरदस्त विजय मिळवत थेट क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या उच्च दडपणाच्या सामन्यात RCB ने 6 गडी राखून 230 धावांचा पाठलाग यशस्वी करत IPL इतिहासातला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग केला.
सामना सुरू झाला तेव्हा बेंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लखनऊच्या कर्णधार ऋषभ पंतने जबरदस्त फलंदाजी करत 61 चेंडूंमध्ये नाबाद 118 धावा करत संघाला भक्कम स्थितीत नेले. मिचेल मार्शने देखील 67 धावा करत पंतला उत्तम साथ दिली. या दोघांनी मिळून 152 धावांची भागीदारी करत संघाचा डाव 227/3 पर्यंत नेला. RCB च्या गोलंदाजांमध्ये नुवान थुषारा याने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी केली, त्याने 4 षटकांत फक्त 26 धावा देत 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरात RCB ने आक्रमक सुरुवात केली. विराट कोहलीने 30 चेंडूंमध्ये 54 धावा करत सुरुवातीला नियंत्रण ठेवले. मात्र मधल्या फळीत काही गडी झपाट्याने गमावले. अशावेळी जितेश शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी संघाच्या विजयाचे सूत्र हाती घेतले. दोघांनी मिळून 107 धावांची नाबाद भागीदारी रचली. जितेशने अवघ्या 33 चेंडूंमध्ये 85 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर मयंकने 23 चेंडूंमध्ये नाबाद 41 धावा करत शानदार साथ दिली. RCB ने 18.4 षटकांत 230/4 धावा करत ऐतिहासिक विजय नोंदवला.
दरम्यान या विजयानंतर RCB आता 29 मे रोजी क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध खेळणार आहे. तर गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात 30 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे.
या सामन्यातील उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार विजेते:
प्लेयर ऑफ द मॅच- जितेश शर्मा
सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच- जितेश शर्मा (SR: 257.58)
सर्वाधिक चौकार आणि षटकार- ऋषभ पंत
फँटेसी प्लेयर ऑफ द मॅच- जितेश शर्मा
सर्वाधिक डॉट बॉल्स- नुवान थुषारा (RCB) – 10 डॉट बॉल्स