18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर इंडियन प्रीमियर लीग 2025 चे विजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरातील चाहत्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्टेडियममध्ये RCB चाहत्यांचीच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
सामना संपेपर्यंत सर्व चाहते स्टेडियममध्ये थांबले आणि मध्यरात्री ट्रॉफी उंचावताना संघाला दाद दिली. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये विजय मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहे. संघातील सर्व खेळाडू, विराट कोहलीसह, ओपन डेक बसमधून शहरात रॅली करणार असून हजारो चाहत्यांसोबत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जाणार आहे.
RCB हा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आठवा संघ ठरला आहे. 2008 पासून खेळणाऱ्या पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यावर अद्याप जेतेपदाची मोहोर उमटलेली नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी पाच वेळा ट्रॉफी जिंकलेली आहे, तर कोलकाताने तीन, राजस्थान, डेक्कन चार्जर्स, गुजरात व हैदराबादने प्रत्येकी एकदा आयपीएल जिंकले आहे.
RCB ने आपला पहिला सामना 18 एप्रिल 2008 रोजी खेळला होता आणि तब्बल 18 वर्षांनी त्यांना विजेतेपद मिळाले. या दरम्यान त्यांनी तीन आयपीएल आणि एक चॅम्पियन्स लीग फायनल गाठल्या होत्या, पण यावेळी त्यांनी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक यश मिळवलं.