मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर हिने आता फिटनेस क्षेत्रात नवा प्रवास सुरू केला आहे. तिने मुंबईत स्वतःचा पिलेट्स स्टुडिओ सुरू केला असून या उपक्रमामुळे तेंडुलकर कुटुंबाला अभिमान वाटत आहे.
या निमित्ताने सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन म्हणतात, “पालक म्हणून, तुम्हाला नेहमीच अशी आशा असते की तुमच्या मुलांना असे काहीतरी करायला मिळेल जे त्यांना खरोखर आवडते. @saratendulkar पिलेट्स स्टुडिओ उघडणे हा आपल्या मनाला भरून जाणारा क्षण आहे.
तिने स्वतःच्या मेहनतीने आणि विश्वासाने, एकामागून एक, हा प्रवास घडवला आहे. पोषण आणि हालचाल आमच्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाची राहिली आहेत आणि ती तिच्या स्वतःच्या आवाजात हा विचार पुढे नेताना पाहणे खरोखरच खास आहे. सारा, आम्हाला यापेक्षा अभिमान वाटतो. तुम्ही सुरू करत असलेल्या या प्रवासाबद्दल अभिनंदन...”
सारा तेंडुलकर ही शिक्षण आणि मॉडेलिंग या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय होती. फॅशन आणि फिटनेसविषयी ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. आता तिने स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात – फिटनेस आणि वेलनेस – या माध्यमातून समाजात योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
साराच्या या नवीन प्रवासाचे स्वागत चाहत्यांसह फिटनेस प्रेमींनीही केले आहे. तिच्या उपक्रमामुळे तरुण पिढीला आरोग्य आणि जीवनशैलीबाबत प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.