IPL चाहत्यांसाठी एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार फलंदाज संजू सॅमसन याने स्वतःहून संघ सोडण्याची इच्छा व्यक्त करत क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजवली आहे. IPL 2026 च्या मिनी-ऑक्शनपूर्वी संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीला अधिकृतपणे कळवले आहे की तो संघात पुढे खेळू इच्छित नाही.
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या अधिकाऱ्यांना एक स्पष्ट विनंती केली आहे की, त्यांना ट्रेड करून दुसऱ्या संघात पाठवावे किंवा त्यांना पूर्णतः रिलीज करावे. या निर्णयामागचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नसले तरी, सॅमसनच्या कुटुंबीयांनी तसेच काही निकटवर्तीय IPL आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी संकेत दिले आहेत की, राजस्थान रॉयल्स संघातील वातावरण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही.
संजू सॅमसनने जरी आपली नाराजी व्यक्त केली असली, तरी IPL च्या नियमांनुसार, कोणताही खेळाडू स्वतःहून संघ सोडू शकत नाही. एकदा खेळाडू ऑक्शनमधून विकत घेतला गेला किंवा रिटेन करण्यात आला की, किमान तीन वर्षांचा करार अटळ ठरतो. सॅमसनचा सध्याचा करार 2027 पर्यंत आहे, त्यामुळे त्याला रिलीज करायचा किंवा ट्रेड करायचा निर्णय हा केवळ राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीकडेच आहे.
IPL 2025 संपल्यानंतरपासूनच संजू सॅमसनच्या संभाव्य ट्रेडची चर्चा रंगू लागली होती. आता तर Cricbuzzच्या अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्स (CSK) सॅमसनला एम.एस. धोनीच्या उत्तराधिकारी म्हणून पाहत असल्याचे बोलले जात आहे. धोनी आणि ऋतुराज गायकवाड यांना गेल्या आठवड्यात CSK च्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करताना पाहिलं गेलं आहे, तसेच CSK अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीत संजू सॅमसनचा मुद्दा चर्चेत आला की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. संजू सॅमसनच्या संभाव्य ट्रान्सफरवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, चाहतेही संभ्रमावस्थेत आहेत.
अनेक चाहत्यांनी सॅमसनला CSKमध्ये खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर काहीजण त्याच्या निर्णयामुळे नाराजी व्यक्त करत आहेत.राजस्थानसाठी 2013 पासून खेळणारा संजू सॅमसन संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत.
मात्र, संघ व्यवस्थापनातील बदल, नेतृत्वावर विश्वासाचा अभाव आणि अंतर्गत मतभेद हे सर्व या निर्णयामागची संभाव्य कारणं मानली जात आहेत. IPL 2026 च्या मिनी-ऑक्शनपूर्वीच अशा मोठ्या बातम्या समोर येणं म्हणजे आगामी हंगामात अनेक धक्कादायक बदल घडण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन जर खरोखरच CSKमध्ये गेला, तर तो केवळ धोनीसाठी उत्तराधिकारी ठरणार नाही, तर CSKच्या फलंदाजीला एक नवीन धार मिळेल.