शुभमन गिलने भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून आपलं पहिलच डिक्लरेशन संकेत दिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या "ऑरा"ची चर्चा रंगली आहे. इंग्लंडविरुद्ध चाललेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील एडबॅस्टन कसोटीत (5 जुलै) ही घटना घडली. मात्र, या क्षणामुळे गिल वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या दुसऱ्या डावातील 83 वे षटक सुरू असताना, सामना अजून तीन सत्र बाकी असतानाही संघ दीर्घ फलंदाजीच्या तयारीत दिसत होता.
मात्र, ड्रिंक्स ब्रेकदरम्यान शुभमन गिलने काळ्या रंगाचे जर्किन घालून मैदानात येत वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाला परत बोलावले यावरून त्याने डिक्लरेशनचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. खरं लक्ष वेधून घेतलं ते गिलने परिधान केलेल्या जर्किनकडे ज्यावर 'नायकी'चा लोगो झळकत होता. सध्या बीसीसीआयचा अॅडिडाससोबत अधिकृत किट प्रायोजक म्हणून करार आहे, जो 2028 पर्यंत लागू आहे. या करारानुसार, अॅडिडासला भारतीय संघाच्या सर्व अधिकृत किटसाठी हक्क प्राप्त आहेत. गिलच्या या कृतीवर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी हे बीसीसीआयच्या ब्रँडिंग धोरणाच्या विरोधात असल्याचे सांगितले.
एका युजरने लिहिले, “अॅडिडास अधिकृत प्रायोजक असताना नायकी घालणं अयोग्य आहे. यावर कारवाई झाली पाहिजे.” दुसऱ्याने म्हटले, “गिलचा हा फोटो व्हायरल होणं त्याच्यासाठी अडचणीत आणू शकतं.” या संपूर्ण प्रकरणावर अद्याप बीसीसीआयने कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, ब्रँडिंग आणि प्रायोजकत्वाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुभमन गिलने जाणूनबुजून हा निर्णय घेतला की ती एक चूक होती, याबाबत स्पष्टता मिळणं गरजेचं आहे. आगामी काळात बीसीसीआय यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.