भारतीय संघातील स्मृती मंधाना ही क्रिकेट विश्वातील चाहत्यांची नॅशनल क्रश देखील बनली आहे. याच नॅशनल क्रशने पुन्हा एकदा स्वतःच नाव भारताची स्टार क्रिकेटपटू म्हणून उंचावलं आहे. स्मृती मंधानाने भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून आपले योगदान दिले आहे. भारताची स्टार क्रिकेटपटूआणि उपकर्णधार स्मृती मंधानाला ODI क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यावेळी स्मृतीसोबत श्रीलंकेची चमारी अटापट्टू, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवॉर्ट आणि ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडूच्या पुरस्काराच्या शर्यतीत होत्या, मात्र स्मृती मंधाना या सर्वांना मागे टाकत ODI क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
ODI क्रिकेटर ऑफ द इअर पटकावला
भारताची डावखुरी सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने तिच्या करिअरमध्ये हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवला आहे. तसेच स्मृतीने 4 आयसीसी पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी महिला फलंदाज आहे. स्मृती मंधानाने 2018 मध्ये पहिल्यांदा ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला होता. जूनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या निर्भेळ मालिकेच्या विजयात स्मृतीने एकामागे एक अशे शतकं झळकवण्याचा विक्रम केला होता. यानंतर डिसेंबर महिन्यात पर्थमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत सामन्यात स्मृतीने लागोपाठ शतक झळकावत आपली महत्त्वाची भूमिका दाखवली होती.
पुरस्कार जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया
पुरस्कार जिंकल्यानंतर स्मृती आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाली की, मी ICC चे मनापासून आभार मानते की, त्यांनी मला ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले... मला याचा आनंद आहे की गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय फॅार्मेटमध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, आणि यामध्ये मी सुद्धा माझे योगदान देऊ शकले. मी आज या पुरस्काराची मानकरी ठरली आहे, त्यादरम्यान मी माझ्या सहकाऱ्यांचे जे सर्व चढ-उतारांमध्ये माझ्यासोबत असतात. तसेच माझ्या कुटुंबियांचे आणि सर्व प्रकारच्या पाठिंब्याबद्दल माझ्या प्रशिक्षकांचे मी आभार मानते. मला फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे मी जास्त पुढचा विचार करत नाही...
स्मृती मंधानाची 2024 मधील जबरदस्त कामगिरी
स्मृती मंधानाचा वर्षभरात एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॅार्ड ठरला आहे. 2024मध्ये स्मृती मंधानाने एकूण 13 एकदिवसीय सामने खेळले आणि या सामन्यात तिने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकवली असून 57.46 च्या सरासरीने 747 धावा केल्या. स्मृती मंधाना 96.15 स्ट्राईक रेटसह 2024 मधील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली.