आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने विजय मिळवून 27 वर्षांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवला आहे. शनिवारी लॉर्ड्स येथे झालेल्या मॅचच्या चौथ्या दिवशी सकाळी दक्षिण आफ्रिकेने जेतेपदाची गदा जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 69 रन्स 3 विकेट्स गमावत केल्या. काइल व्हेरेनने विजयी शॉट मारत दक्षिण आफ्रिकेला 1998 नंतरचं पहिलंच आयसीसी जेतेपद जिंकून दिलं.
नेहमी आयसीसी स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश करून पराभव नावे कोरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने यावेळी विजयाचा गुलाल उधळला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात सर्व 11 खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं. दुसरीकडे, हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजत असतानाही टेम्बा बावुमाने शानदार खेळी केली. बावुमाने 134 चेंडूत 66 धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. विरोधी कर्णधार पॅट कमिन्सने बावुमाला धावबाद केले.