सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या विनोद कांबळींनी त्यांचा बालपणीचा मित्र सचिनसोबत मुंबईच्या प्रसिद्ध कांगा लीगमध्ये पदार्पण केले. एक काळ होता ज्यावेळेस विनोद गणपत कांबळी हे नाव क्रिकेटच्या जगात धुमाकूळ घालत होते.16 वर्षांच्या विनोद कांबळींनी 349 नाबाद धावा काढल्या होत्या. डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपात भारतीय संघाला एक स्टार खेळाडू मिळाला होता. विनोद कांबळीची कारकीर्द जरी लहान असली तरी ती खूप विक्रमांनी भरलेली होती.
मात्र एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. खराब आरोग्य, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक संघर्षाशी तो झुंज देत आहे. पण या कठीण काळात माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याला दिलासा देत दर महिन्याला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी विनोद कांबळीला युरीन इन्फेक्शन आणि अंगावर पेटके आल्याने एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी विनोद कांबळीची आर्थिक परिस्थितीही बिकट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात गावसकर यांनी कांबळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. लोकशाही मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, गावसकर यांनी त्यांच्या चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून विनोद कांबळीला मदत करण्यास सुरुवात केली आहे.